“अफलातून सोंगाड्या”

“अफलातून सोंगाड्या”

त्यावेळी मधु कांबीकर ऐन यौवनात होत्या.नुकतीच दादांशी ओळख झालेली.एका सिनेमाच्या संबधात दोघेही व्यस्त होते.अशात मधुताई एका दाक्षिणात्य निर्मात्याच्या संपर्कात आल्या..दक्षिणेत संधी मिळतेय म्हणून मधुताई ही खुश होत्या.

पुढे हळूहळू त्या निर्मात्याचा मनसुबा ताईंनी हेरला.त्याला बी ग्रेडचा सिनेमा बनवायचा होता.अपेक्षाही भलत्याच होत्या.ताईंना अश्लील फोन करून त्रास होऊ लागला.त्यांची मानसिकता ढासळू लागली.

मनाचा हिय्या करून ही बाब त्यांनी दादांना सांगितली..

मग काय “दादा” नावाच्या भल्या माणसातला “दादा” जागा झाला..आणि मातोश्री कडे धाव घेतली.दरदरुन घाम फुटलेल्या अवस्थेतील तो दक्षिणात्य निर्माता सोफ्यावर बसलेला,समोर दादा..शेजारी मधुताई _ अर्थात,ही बैठक दादांनी घडवून आणलेली..

मग काय _ भगवं वस्त्र परिधान केलेली..रुद्राक्षाच्या माळा हातात घातलेली..चष्म्यातून नजरेचा वार करणारी ती व्यक्ती हजर झाली..श्रीमान बाळासाहेब ठाकरे ! “लुंगीवाल्या,माझ्या मराठी मुलींकडे वाकडा डोळा करशील तर महाराष्ट्रात सोड पण या जगातही ठेवणार नाही तूला” वाघाची ही डरकाळी ऐकल्यावर तो दक्षिणी अक्षरश: मधुताईंच्या पाया पडला.

दादांनी एका मराठी अभिनेत्रीचे असे संरक्षण केले. आज दादा जाऊन वीस वर्षे लोटली..पण त्यांच्या सिनेमांचा करिश्मा आजही कायम आहे.गोकुळाष्टमीच्या दिवशी जन्मलेल्या दादांना कृष्णा हे नाव दिलं.

सुरवातीला अपना बाजार मध्ये नोकरी केली.फावल्या वेळात बँड पथकात वादक म्हणून काम केले.नाटकात कामाची आवड तर होतीच..सुदैवाने त्यांचा परीचय ख्यातनाम लेखक वसंत सबनिस यांच्याशी झाला.

“विच्छा माझी पूरी करा” या त्यांच्या नाटकात दादांना संधी मिळाली.या नाटकाचे चक्क १५०० प्रयोग झाले.पुढे त्यांच्या कामावर प्रभावित होऊन भालजी पेंढारकर यांनी दादांना “तांबडी माती” या पहील्या सिनेमात संधी दिली _ दादा ईथेही भाव खाऊन गेले..

 

मग दादांनी स्वतःच्या सोंगाड्या फिल्मची निर्मिती केली..मुम्बईत कोणीच थीएटर मालक त्यांचा सिनेमा लावेना..कारण..ना सुरेख देहयष्टी,ना नावाचं वलय..होता फक्त ग्रामीण बाज..अशात पुन्हा “बाळासाहेब” गरजले आणि सोंगाड्या दिमाखात मुम्बईप्रांत गाजवू लागला_ चक्क सुपर-डूपर हिट ठरला..

असे दादांचे ९ सिनेमे सिल्वर ज्यूब्ली ठरले..एक ना अनेक भन्नाट चित्रपटांची यादी..मागे वळुन पाहिले नाही.द्वीअर्थी संवादामुळे सेंसॉरशी वैर पत्करलेलं..पण प्रेक्षकांची नाडी अचूक ओळखलेल्या दादांनी हेही युध्द प्रत्येक वेळी जिंकलं.

मागे एकदा हिंदी नायक गोविंदाला कोणीतरी डीवचुन विचारलं की,”तुझा चेहरा काहीसा त्या नाडीवाल्या दादा कोंडके सारखा दिसतोय मग तूला कसं वाटतं?” यावर गोविंदाने छान उत्तर दिलं _ “ये तो मेरे लिये फक्र की बात हैं.अगर मैं दादा जैसे दिखता हूँ,तो उनका कॉमिक सेंस जरुर अपनाउँगा..!” आणि त्याचा एका चित्रपटात चक्क त्याने दादा साकारला होता..

हिरो नं वन मध्ये एका गाण्यात तो नाडी वाली चड्डी घालून नाचला होता.. असे अवलिया दादा १४ मार्च १९९८ ला आपल्यातून गेले..आणि आपल्या निखळ हसण्यातली अवखळ नाडीच गळून पडली.

दादा नेहमी म्हणायचे “मी बाहुल्या(पुरस्कार)मिळवायला सिनेमा नाही बनवत _ माझा प्रेक्षक क्षणभर दुःख विसरून खळखळून हसला पाहिजे..!”

अशा महाराष्ट्राच्या अफलातून सोंगाड्याचा काल  स्मृतिदिन होता …. मानाचा मुजरा !!

_ मोहन एकनाथ पडवळ

Leave a Reply

error: Content is protected !!