श्री सिद्धिविनायक मुळ रहस्य व श्रीस्वामी समर्थांचा संबंध !

श्री सिद्धिविनायक मुळ रहस्य व श्रीस्वामी समर्थांचा संबंध

 

मुंबई महानगरीच्या मोहमयी वातावरणात वेगवान आयुष्य जगणारा मुंबईकर कितीही थकून गेला तरी प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाकडे संधी प्राप्त होताच दर्शनासाठी येतोच. या मंदिरात आल्यानंतर त्याला जे समाधान मिळते ते अवर्णनीय आहे.

मुंबईतील पश्‍चिम व मध्य रेल्वेच्या मार्गावरचे दादर हे मुख्य ठिकाण. दादर रेल्वे स्थानकावरून पायी गेल्यास पंधरा मिनिटांवर हे सिद्धिविनायकाचे मंदिर आहे.

सिद्धिविनायक मंदिराच्या परिसरात जाणार्‍या बसेस मिनिटामिनिटाला मिळू शकतात. दादर पश्‍चिमेला रानडे रोडवरून उजवीकडे वळणार्‍या रस्त्याने छबिलदास गल्लीतून प्लाझा सिनेमाच्या दिशेने वर सरले की डावीकडे बसथांबा आहे.

टॅक्सीतून जायचे असल्यास तीही सोय उपलब्ध आहे. मुंबईच्या विविध भागातून प्रभादेवी येथे जाण्यासाठी बसेसची उत्तम व्यवस्था आहे. दादरप्रमाणेच एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावरून परेल एस.टी.डेपोजवळून सरळ चालत गेल्यास लेनीनग्राड चौकानंतर येणार्‍या साने गुरुजी उद्यानाच्या एका बाजूस हे मंदिर आहे.

पूर्वपीठिका:

मंदिराचा प्रसिद्धी काल अगदी अलीकडचा आहे. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थांचे या स्थानाला आशीर्वाद मिळाले नि स्थानाची जागृतता वाढून भरभराट झाली. यासंबंधी रामकृष्ण जांभेकर महाराजांनी स्वामी समर्थांच्या आदेशावरून या स्थानावर सिद्धी पुरल्या. तो एकूणच इतिहास मोठा रंजक आहे.

त्याआधी मंदिराची अवस्था तितकीशी चांगली नव्हती. या मंदिराची वा सिद्धिविनायकाची मूळ स्थापना कोणत्या साली झाली, याची नोंद अद्यापतरी सापडलेली नाही. काहींच्या मतानुसार हे मंदिर १०० वर्षांपूर्वीचेच असावे ! ‘देऊबाई पाटील ह्या सधन स्त्रीने ते बांधले.

त्या माटुंग्याला राहत. या परिसरात त्यांच्या अनेक वाड्या होत्या. आर्थिक स्थिती भरभक्कम असली तरी पाटील उभयतांना मूल नव्हते. ते व्हावे म्हणून देऊबाईनी नवस केला की ‘मूल झाल्यास गणपतीचे मंदिर उभारू.’ तथापि, मूल घरात येण्याआधीच देऊबाईंचे पती निवर्तले.

आपले मागणे पूर्ण झाले नाही तरी देऊबाईंनी नवस पूर्ण केला. त्यांच्या घरात सिद्धिविनायकाचे चित्र होते. त्याला अनुसरून त्यांनी गणेशमूर्ती बनविली. नंतर लहानसे मंदिर उभारून त्यात सिद्धिविनायकाची स्थापना केली. –

वरील कथेला छेद मिळतो तो कै. रघुनाथशास्त्री यांच्या ‘मुंबईतील देवालये’ या ग्रंथात सापडलेल्या सिद्धिविनायक मंदिराच्या बांधणीच्या नोंदीमुळे!

१९ नोव्हेंबर १८०१ साली लक्ष्मण विठू पटेल(पाटील?) यांनी हे गणेश मंदिर बांधल्याची नोंद सापडते. हल्ली निघालेल्या अनेक पुस्तकातून या प्रकरणी सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न करण्यात आला की देऊबाईंनीच लक्ष्मण विठू पटेल यांच्याकडून मंदिर बांधून घेतले, म्हणे! जुन्या धाटणीचे सिद्धिविनायकाचे मंदिर नि माहिम -माटुंग्याच्या लेडी जमशेदजी रोडवर गोपी टँकपुढे आडवा छेद देणार्‍या कटारिया मार्गावर आतल्या बाजूला असलेले काशीविश्वेश्वराचे मंदिर यात सारखेपणा आहे.

काशीविश्वेश्वर मंदिराची स्थापना इ.स.१७७९ सालच्या जवळपासची आहे. अभ्यासक वा संशोधकांखेरीज भाविकांना स्थापनाकालाच्या कथांत रस नाही. मात्र, हे स्थान झटकन भरभराटीला कसे आले, यात सर्वांनाच औत्सुक्य आहे. लोकविलक्षण घडामोडी: रामकृष्ण महाराज जांभेकर हे गायत्री मंत्राचे उपासक. त्यात मुस्लिम अवलियांकडून त्यांना विविध विद्या प्राप्त झाल्या होत्या. ते गुजरातेतल्या सुरतेत स्मशानात राहत.

१९३०-३१च्या दरम्यान ते मुंबईत आले. सुरवातीला ते प्रभादेवीला एका भूतबंगल्यात राहत. ते जे चमत्कार करत त्याच्या कथा ऐकून अचंबित व्हायला होते. असामान्य व अलौकिक अशा या उपासकासमोर कोणी साधुपुरुषही टिकणार नव्हता.

अक्कलकोटच्या ब्रह्मांडनायक श्रीस्वामी समर्थांविषयी त्यांना समजले तेव्हां जांभेकर महाराजांनी स्वामींना जिंकून घेण्याचा विचार मनात आणला. तत्काळ स्वामी समर्थांनी दृष्टांत देवून जांभेकर महाराजांना अक्कलकोटला बोलावून घेतले. स्वामी समर्थांवर सिद्धिचा वापर करण्यास जांभेकर महाराज निघाले.

इथे एक बाब लक्षात घ्यावयास हवी की १८७८ ला स्वामींनी देह ठेवला होता तर रामकृष्ण जांभेकर महाराजांबाबतची हकिकत बावन्न वर्षांनंतरची आहे. अक्कलकोटचे स्वामींचे वास्तव्य संजीवन आहे, याची ही प्रचिती होती. ‘गारूड्यांचा खेळ मला दाखवतोस काय? आधी सिद्धिच्या सगळ्या बाहुल्या काढून दे,’ असा आदेश स्वामींनी दिला.

जांभेकर महाराज स्वामींचे अंकित बनले. सिद्धिच्या काळ्या बाहुल्या त्यांनी काढून दिल्या. त्यातील मुख्य दोन सिद्धि वगळून अन्य बाहुल्या स्वामींनी आपले शिष्य व ज्यांच्या घरात स्वामी रास्तव्याला असत, त्या चोळप्पांच्या बाहेरच्या पडवीत पुरायला लावल्या. उर्वरित, ‘दोन सिद्धि नेहमी ज्या गणपती मंदिरात जातोस त्या समोर पुरून ये,’ असा आदेश दिला. जांभेकर महाराजानी तसे केले व पुन्हा स्वामीसेवेसाठी ते तिथे गेले. महिनाभर स्वामींची सेवा केली.

 

मुंबईत परतल्यानंतर त्यांनी पुढे ज्या काही अलौकिक गोष्टी केल्या त्या स्वामींचे अंकीत होवूनच. जांभेकर महाराज शिष्यांनी आणलेल्या भेटी स्वामींच्या तसबिरीकडे ठेवण्यास सांगत. कुणाच्या समस्या असल्यास त्या आजोबांना विचारून सांगतो, असे ऐकवून काही दिवसांनी बोलावित. मी समर्थांचा नातू व ते आपले आजोबा असे सर्वांना ते सांगायचे.

मात्र, देहभान उडाले असताना काही वेळा समर्थांना थेरडा म्हातारा असेही संबोधित! जांभेकर महाराज अक्कलकोटला जाऊन समर्थसेवेला लागले. तेव्हा त्यांनी चोळप्पांचे नातू गोविंद पुजारी यांना सांगितले की स्वामी समर्थांचा वावर असलेल्या या ठिकाणी एक मांदाराचे झाड उगवेल.

एकवीस वर्षांनी त्यातून स्वयंभू गणेश प्रकटेल. त्यानंतरच माझा प्रभादेवीचा सिद्धिविनायक जागृततेचा मोठा प्रत्यय दाखवून देईल. सर्वत्र श्री गणेश दैवतांची उपासना वाढीस लागेल व माझीही प्रचिती लोकांना येईल. त्यांच्या बोलण्याप्रमाणे पुढे १९६६ साली चोळप्पांच्या घरी मांदाराच्या मुळातून स्वयंभू श्रीगणेश प्रकटले. प्रभादेवीचा सिद्धिविनायक तेव्हापासून खर्‍या अर्थाने सिद्ध झाला.

या गणेशाची उपासना सद्य काळात किती वाढीस लागली, हे वेगळे सांगावयास नकोच. जांभेकर महाराजांच्या शिवाजी पार्क चौपाटीजवळच्या स्मशान भूमीच्या बाजूला असलेल्या समाधीमठात विशेष गर्दी होत नसली तरी तेथे प्रसन्नता नि अद्भुतमय वातावरण जाणवते. सिद्धिविनायक मंदिरापासून या मठापर्यंतचे अंतर पायी गेल्यास पंधरा मिनिटांचे असेल. जांभेकर महाराजांनी सिद्धिविनायक मंदिरावर पूर्ण लोभ ठेवला होता.

त्यांचे पट्टशिष्य नामदेव महाराज केळकर हे आधी मंदिराचे कामकाज पाहत, अशी नोंद गोविंद चिंतामणी फाटक या मंदिराच्या पुजार्‍यांनी एका लेखात केली असल्याचे आढळते. १९३४ साली गोविंद फाटक हे चरितार्थाकरिता मुंबईत आले. महाराजांची कीर्ति ऐकून ते दर्शनास गेले. त्यांना महाराजांची कृपादृष्टी लाभली.

श्री सिद्धिविनायक
श्री सिद्धिविनायक

नोकरीही मिळाली. पण, तीन महिन्यातच नोकरी सोडली. नंतर सेंच्युरी मिलमध्ये काम करण्याची दुसरी संधी मिळाली.

काही वर्षात तेही काम त्यांनी सोडले. दरम्यान, महाराजांनी फाटक यांना मुंबईत बिर्‍हाड थाटावयास सांगितले. नामदेव महाराज केळकरांना आपल्या सेवेसाठी बोलावून घेतले तर देवस्थानाची पूजाअर्चा करावयाची कामगिरी त्या स्थानाच्या मालकिणीस सांगून फाटक यांच्याकडे सोपविली. तेव्हा मंदिरापेक्षा समोरच्या सुंदर तलावाचे परिसरातील लोकांना मोठेच आकर्षण होते.

श्री. फाटक यांनी महाराजांच्या आज्ञेवरून होमहवन व उत्सव जोरात सुरू केले. ६६ सालानंतर हा सिद्धिविनायक मुंबईकरांचा मानाचा गणपती बनला आहे. मंगळवार वा तत्सम गणेश उत्सवाच्या दिवशी किलोमीटरभर लांबीच्या भक्तगणांच्या रांगा भाविकतेचे महान दर्शन घडवतात. उत्सवांच्या दिवशी काही लाख लोक लांबलांबहून दर्शनासाठी येतात. मंदिर वर्णन: पूर्वी पुरातन बांधणीचे मंदिर होते. सध्या मंदिराचे रूप आमूलाग्र बदललेले आहे.

मूळ गर्भगृहातील मूर्ती तशीच ठेवून सहा मजली अत्यंत आकर्षक बहुकोनाकृती इमारत बांधली. कोनाकृती भागाच्या वरच्या टोकास कळस आहे. मुख्य मंदिराच्या मधोमध सोन्याचा कळस असून बाजूचे काही छोटे कळस सोन्याचे तर काही पंचधातूचे आहेत.

मंदिरास तीन द्वारे आहेत. मंदिरातील गर्भगृहाची मखरे बनविणारे मुस्लिम पंथीय असून या घराण्याकडे नाजूक कलाकुसरीचे काम करण्याची परंपरा आहे. मक्का मदिना या धर्मस्थळांवरील कामेही याच घराण्याने केली.

कळसाचे काम मात्र एका मराठी व्यक्तीने केले! कळसाच्या सोन्याचे पापुद्रे उचलले गेल्याचे वृत्त वाचल्याचे अनेकांना आठवतच असेल! मंदिराच्या तिसर्‍या मजल्यावर अभ्यासिका व वाचनालय आहे.

पहिला व दुसरा मजला कर्मचार्‍यांसाठी व व्यवस्थापन कार्यालय आहे. अवांतर माहिती: पूर्वी गणेशासमोर डाव्या सोंडेची एक गणेशमूर्ती होती. सध्या ती जाग्यावर दिसत नाही. त्याऐवजी दुसरी सिद्धिविनायकाची मूर्ती ठेवल्याचे दिसते.

मंदिरापासून जवळच सेंच्युरी मिलच्या दिशेने जाताना बँगॉल केमिकल कंपनीच्या अलीकडे वाहतूक सिग्नलजवळ डाव्या बाजूस आतमध्ये ज्या देवीवरून या परिसरास नाव पडले त्या प्रभादेवीचे जागृत स्थान आहे.

अनंत देव, वाई यांनी लिहिलेला हा लेख फेसबुकच्या माध्यमातून प्रसिद्ध झाला.

Leave a Reply

error: Content is protected !!