शंभुराजांना पकडून जेव्हा औरंगजेबासमोर आणलं, तेव्हा….

छत्रपती संभाजी महाराज

शंभुराजांना पकडून जेव्हा औरंगजेबासमोर आणलं, तेव्हा तो औरंगजेब “सिवाच्या पोराला” पाहायला सिंहासन सोडून खाली उतरला. अत्याचाराने माराने घायाळ झालेले शरीर,  पण…. मान ताठच, नजर हि तशीच….त्या नजरेकडे पाहत औरंगजेब विचार करू लागला…. तो हाच का संभा?? ज्याने ह्या आलमगीराला नऊ वर्षे रानोमाळ हिंडवल…. एखादा मेंढपाळ आपल्या मेंढ्या घेऊन फिरतो तद्वतच ह्याने मला फिरवलं…..  

माझे नामांकित सरदार ज्यांच्या शौर्यावर मी अनेक लढाया जिंकल्या, त्यांनाच ह्याने आस्मान दाखवलं?? माझी कैक लाखांची सेना… लांबून एखाद्याने पहिली तर छातीत धडकीच भरावी एवढं अफाट अफाट मनुष्यबळ…. पण ह्या संभाजीने पार वाट लावली त्यांची,तो हाच का संभाजी??

वाटलं होत संभा म्हणजे शिवाजीच्या पोटाला आलेला तख्तनशील वारीस, संभाजी म्हणजे व्यसनी, दुराचारी, संभाजी म्हणजे बदफैली, संभाजी म्हणजे नादान बच्चा सिवाचा, पण…..  पण नाही, माझा अंदाज साफ चुकला,ह्या नादान पोरानं बुढाप्यामध्ये मला जवान बनवलं, त्या सिवापेक्षा दहापट अधिक तापदायक आहे हा संभाजी…..

अरे त्या सीवाने माझे किल्ले किल्ले जिंकले, प्रदेश जिंकला पण कधी बुऱ्हाणपूरला हात नाही घातला, पण हा संभाजी गादीवर आला आणि सगळ्यात आधी ह्याने बुऱ्हाणपूर लुटलं, भागानगर जाळून टाकलं, कैक कोटींचा खजिना ह्याने ओढून आपल्या वळचणीला टांगला… साढे आठ वर्षांचा असताना हा आला होता सिवाबरोबर आग्र्यात, त्यावेळी मी त्याला विचारलं होत…  

“क्यों रे संभा, तुम्हे डर नही लगता हमारा??” तेव्हा हा म्हणाला होता, “हमें किसीका डर नही लगता, पर हमारी वजाहसे सबको डर लगता है.”

हाच तो संभाजी….पुरे हिंदुस्थान के आलमगीर होना चाहते है हम… पण माझ्या ह्या महत्वाकांक्षेलाच यानं छेद दिला, बुढाप्यामध्ये जवान बनवला ह्या पोराने मला, ह्याची माणसं हि तशीच बेडर, धाडसी, पराक्रमी,तो तो तो नाशिकचा किल्ला “रामशेज”…. किल्याच्या खाली माझी ३०-४० हजारांची फौज आणि किल्ल्यावर ह्याची अवघी ६०० माणसं, पण सहा वर्षे अजिंक्य ठेवला किल्ला त्यांनी,  

माणसाच्या हृदयात काय पेरतो हा कुणास ठाऊक?? मी इंग्रजांना ह्यांच्याविरुद्ध चिथावलं, पुर्तुगीझांना ह्यांच्याविरद्ध उभं केलं, सिद्धी ला ह्याच्या विरुद्ध लढायला प्रवृत्त केलं, पण सगळ्यांच्या उरावर पाय देऊन हा उभा राहिला, इंग्रजांना चारी मुंड्या चित केलं, पुर्तुगीझांची हाडे खिळखिळी केली, जंजिऱ्याच्या सिद्धीचा तर कंबरडंच मोडलं ह्याने, माझं कैक लाखाचं सैन्य, माझे नातलग,

माझे शाहजादे ह्या सगळ्यांवर जबरदस्त जरब बसवली ह्याने, माझ्या सैन्याने तर आपण कुठे मरणार हे पण गृहीत धरलं होत.  मद्रास, पाषाणकोट, तंजावर, जंजिरा, प्रत्येक जागी हा आणि ह्याची माणसे आहेतच, जळी स्थळी काष्टी पाषाणी जणू हाच दिसत होता मला, कसल्या मिट्टीचा बनलाय हा??

औरंगजेब आसन सोडून उठला आणि त्या खुदाचे आभार मानायला जमिनीवरून गुडघे टेकून बसला….. “अय खुदा, आखीर तुने वो दिन दिखाया….. शुक्रगुजार है हम तेरेकाय कविराज ह्या अशा वेळी सुचतीय का एखादी कविता?”आणि तत्क्षणी कविराज बोलते झाले….

 

“राजन तुम हो सांझे, खूब लढे हो जंग, देख तुम्हारा प्रताप महि, तखत त्यजत औरंग”

याचा अर्थ असा : राजन काय लढलात आपण… काय तुमचं ते शौर्य…. तुमचा प्रताप पाहून हा औरंगजेब स्वतःच सिंहासन सोडून तुमच्या समोर गुढघे टेकून बसलाय….  .

आणि मग सुरु झालं अत्याचारांचा पाशवी खेळ, ४२ दिवस सतत, सलग, क्षणाक्षणाला, भीमा-इंद्रायणी सुद्धा आसवं गळू लागल्या…. ह्या अत्याचारांच्या शृंखलेत एक दिवस असाही आला जेव्हा “मियाखान” ज्याच्या दोन्ही मुलींची लग्ने स्वतः संभाजीराजांनी स्वतःच्या बहिणी समजून लावून दिली होती,

तो आला…पाहिलं त्याने “मराठ्यांच्या राजाची झालेली दुरावस्था”, डोळे काढलेत, कान कापलेत, हातापायाची बोटे छाटलीत, रक्त….फक्त रक्त ठिबकतंय त्यातून… चामडी सोलून काढलीय पूर्णांगाची…. त्यावर बसणारे किडे, माश्या पहिल्या, त्यांचा होणार त्रास बोलून दाखवायला वाचाच राहिली नव्हती…जीभ छाटली होती माझ्या राजाची….तो मियाखान अशाही परिस्थितीत विचारता झाला शंभू राजांना,  

“राजं वाचवू का तुम्हाला?? घेऊन जातो तुमच्या स्वराज्यात… ” आवाज ओळखीचा वाटला तशी शरीराची तगमग, तडफड सुरु झाली, हातपाय हलायला लागले, उठून बसायचा एक केविलवाणा प्रयत्न आणि तो हि सपशेल फसला…. सततचे अत्त्याचार सोसून जर्जर झालेला देह साथ देईनासा झाला…. आणि त्यांची अशी अवस्था पाहून पुन्हा मियाखान बोलला.. ”

नको राजं…. नकोच….. तुम्हाला हा असा स्वराज्यात घेऊन गेलो तर तिथली रयत माझ्यावर छी थू करेल, मलाच मृत्यूच्या दाढेत लोटून देईल… विचारेल मला ज्याने तुझ्या मुलींची लग्ने स्वतःच्या बहिणी समजून लावून दिली त्या… त्या आमच्या राजाची अशी अवस्था झाल्यावर त्याला आमच्याकडे घेऊन येताना तुला लाज नाही वाटली का?? नाहीत सहन होणार मला त्यांच्या आरोपांच्या फैरी…त्यापेक्षा तुम्ही इथ मेलेलंच बरं….”

हे शब्द ऐकताच थरारला-शहारला छावा, साखळदंडांनी जखडलेल्या देहाला हिसके बसायला सुरुवात झाली…. त्यांच्या आवाजांनी त्या भयाण रात्रीची शांतता भंग पावली, चोरट्या पावलांनी शंभुराजांना भेटायला,  पाहायला आलेला मियाखान मृत्यूच्या कराल दाढेत अडकल्यासारखा जागच्या जागीच थिजून थरथरायला लागला … मशाल विझली…. आणि त्यातून ऐकू येऊ लागला साखळदंडांचा संथ आवाज… काही वेळानंतर तो आवाजही थांबला…..

संभ्याला काय झालं हे पाहायला आलेल्या एका पहारेकरी हशमाला तो रक्तात लोळागोळा होऊन पडलेला शंभूंचा देह हातातल्या मशालीच्या उजेडात दिसला…. तो पाहिल्यावर एक विषारी फुत्कार टाकून तिथे असलेली एक मशाल पेटवून तो हशम शंभूराजांपासून निघून गेला… अंधारात लपून बसलेला मियाखान काही वेळानी बाहेर पडला…. मघाचा साखळदंडांचा आवाज त्याला राजापर्यंत यायला भाग पाडत होता…. तो आला… आला… जवळ आला…

Travel Blogs

समोरच्या मशालीच्या उजेडात मघाची झालेली हालचाल कशासाठी होती हे शोधू लागला आणि तिथल्याच एका दगडी शिळेवर बोटं तुटल्या हाताने शंभूराजांनी लिहिलेले शब्द वाचून पुरता शहारला…वाचवाच मला खांसाहेब, माझ्या नुसत्या जिवंत असण्यानेसुद्धा हा औरंगजेब बादशहा खंगून खंगून मारून जाईल…. वाचवाच मला खांसाहेब”

मरणाच्या दाढेत पडलेला असूनसुद्धा…  अरे मृत्यू देहावर, विचारांवर थैमान घालत असताना सुद्धा फक्त आणि फक्त स्वराज्यासाठी जगायची, रयतेसाठी लढायची, अशाही परिस्थितीत असलेली दुर्दम्य इच्छाशक्ती पाहून पुरता भारावून गेला… एखाद्या लहान बाळासारखा मुसमुसून रडायला लागला…. अल्लाहकडे हात पसरून बोलायला लागला,

“इन्सानियत का सच्चा वारीस आज तेरे करीब आ रहा है, उसपे अपनी रेहमात बरसा, तेरे जन्नत के दरवाजे इस पाकदिल इन्सान के लिये हमेशा खुले रख”….

अरे दुष्मनाच्या काळजात घर करून राहिलेला… दुश्मन ज्याच्या अफाट ताकदीचा चाहता झाला… त्या…. त्या महाराष्ट्राच्या दुसऱ्या छत्रपतीला, दस्तुरखुद्द छात्रपती शिवरायांच्या छाव्याला आमच्या स्वकीयांनीच रेखाटताना खूप वेगळा रेखाटला…. आम्हाला संभाजी सांगितला ना…पण तो सांगितला असा… संभाजी म्हणजे व्यसनी, बदफैली, रगेल आणि रंगेल, आणि तेवढाच संभाजी आम्ही लक्षात ठेवून त्याच बलिदान मात्र सोयीस्कररीत्या विसरून गेलो..

९ वर्षे… सलग ९ वर्षे… इंग्रज, पोर्तुगीझ, सिद्धी, मोघल अशा एक नाही तब्बल बारा बारा आघाड्यांवर स्वराज्यासाठी दुश्मनांची ससेहोलपट करणारा संभाजी आम्हाला कुणी सांगितलाच नाही… वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत पंडित ठरलेला, सातसतक, नखशिखा, बुधभुषणंकार झालेला नृपशंभो आम्हाला कुणीच नाही दाखवला, दुष्काळाने पीडित रयतेला शेतसारा माफ करून सरकारातून पैसे आणि बी-बियाणं पुरवून शेतीला आणि शेतकऱ्याला आधार देणारा जाणता राजा नाही सांगितला…

तब्बल १४० लढाया करून एकही लढाईत पराभूत न झालेला रणमर्द सर्जा संभाजी आम्हाला कळूच दिला नाही कुणी.. .स्वतःच्या बायकोला “स्त्री सखी राज्ञी जयती” असा ‘किताब देऊन तत्कालीन पुरुषप्रधान संस्कृतीला उघड आव्हान देत स्त्री पुरुष समानतेचं मूळ धरून मुलखीं कारभार सोपवणारा द्रष्टा सुधारक कधी सांगितलाच नाही आम्हाला…. वडिलांच्या स्वराज्यमंदिरावर स्वतःच्या प्राणांची आहुती देत कळस चढवणारा,

“पुत्र व्हावा ऎसा गुंडा-ज्याचा तिन्ही लोकी झेंडा” ह्या तुकोबारायांच्या पंक्तीला पुरून उरलेला सज्ञान कर्ता पुत्र नाही सांगितला.. .भक्ती आणि शक्तीचा सुंदर मिलाफ ठरलेली पंढरपूरची वारी आणि संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आदी विभूतींच्या पालख्या सुरु करून त्यांना सरकारातून खर्च आणि संरक्षण देणारा संस्कृती पुरस्कर्ता नाहीच दाखवला. .रामशेज सारखा सगळ्यात कमी उंचीचा पठारी किल्ला सतत सहा वर्षे कमी मनुष्यबळावर झुंझवता ठेवणारा झुंझार रणमर्द नाही दाखवला….

रयतेला छळणाऱ्या सिद्धीला समुद्रात बुडवायचा चंग बांधून ८०० मीटर लांबीचा समुद्रात भराव टाकून पूल बांधणारा इंजिनियर नाहीच सांगितला… राजद्रोहासारखे गंभीर गुन्हे माफ करून वडिलधाऱ्यांचा मान आणि इज्जत अबाधित ठेवणारा एक मानी संस्कारी राजा नाही सांगितला कुणी… बाणांच्या वर्षावात मनुष्यहानी होऊ नये म्हणून जनावरांच्या कातडीची जॅकेट तयार करून सैन्याची काळजी वाहणारा रणमर्द झुंजार नाही दाखवला….  

मराठ्यांच्या स्वराज्याचा दुसरा छत्रपती, धाकलं धनी संभाजी महाराज…. ज्याचा जवळचा मित्र रायाप्पा एक “महार”, ज्याला सोडवायला तयार झालेला मियाखान एक “मुसलमान”, आपल्या धन्याच्या मरणाची वाट आपण शत्रूला दाखवली म्हणून १०-१२ वर्षांच्या वयात पश्चात्ताप करत शत्रुलाटेवर तुटून पडत त्यांच्या छावणीतले डेरेदांडे जाळत मृत्यू जवळ करणारी ती आठ पोरं “धनगर”, मलकापुरात दहा हजाराची राखीव आणि अजिंक्य फौज तयार करून देणारा, कवी आणि कवित्व जपतानाच राजधानी रायगडावर आलेलं शत्रू वावटळीची शेंडीला गाठ मारून धूळधाण उडवणारा… राजाचा श्वास जणू असा कविराज कलश एक “ब्राम्हण”,

“#ब्राम्हण म्हणून कोण मुलाहिजा ठेवतो?? आणि #मराठा म्हणून कोण पाठी घालतो”?? अशी कणखर भूमिका ठेवणारा द्रष्टा व बहुजनवादी राजा म्हणजेच स्वराज्याचे दुसरे छत्रपती… धाकलं धनी…. महाराज… रणमर्द झुंजार… छावा….सर्जा संभाजी छत्रपती..

देश धरम पर मिटने वाला शेर शिवा का छावा था…. महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था….

“शंभूराज तुम्हाला ह्या मावळ्याचा त्रिवार मनाचा मुजरा.

जयजिजाऊ…… जयशिवराय….जय_शंभूराजे !

————————————————————

आमचे इतर लेख वाचण्यासाठी या वेबसाईट वर क्लीक करा ! https://koshtee.com/

आमचे फेसबुक पेज फॉलोव करण्यासाठी येथे क्लीक करा  https://www.facebook.com/KoshteeOfficial

1 thought on “शंभुराजांना पकडून जेव्हा औरंगजेबासमोर आणलं, तेव्हा….

  1. Shreemant chatrapati Sambhaji Maharaj apla vishya hard,ya mavalyakadun aplyala manacha mujra
    // Jagdamba //

Leave a Reply

error: Content is protected !!